ससा... कासव…आणि आपण सर्व

 ससा.. कासव...आणि आपण सर्व...


सत्ता... विरोध... समाज भान,सामाजिक जबाबदारी,रोजचे
जगणे कोणाला चुकले नाही !

सजीव,निर्जीव,संवेदनशील ,भावनिक,राग,लोभ,मोह,मत्सर, मागण्या अधिकार या सर्व सभोवतालात आपले घर,शाळा,कार्यालय,व्यवसाय ,या चक्रात आपला सहभाग असतोच,काळ, वेळ,परिस्थिती सानिध्यात ,संवाद,विसंवादात आपण सर्व नक्की कुठल्या प्रगतीच्या दिशेला चाललोय?

देश,प्रदेश,स्वातंत्र्य, स्वायत्तता, या अवस्थेतून जन्म,बालपण,शिक्षण,संगोपन ,स्थैर्य, गरज,निकड,अधिकार,जाणिवा, समज ,देत सहकार,असहकार करताना,व्यवस्थेला,विरोध,आणि सहकार्य करतानाचे,आपले जगणे शोधणे सुरू आहे.

सत्ता, निवडणुका, नेता,उमेदवार ,पक्ष,गट,संस्था समूहातून प्रगतीचा आलेख रचताना,सामाजिक संस्कार,परिसर,सानिध्यातून मिळणारे शिक्षण,प्रशिक्षण,स्पर्धा, चढाओढ या सर्व जीवित राहण्याच्या प्रक्रीया आहेत.

प्रशिक्षण,आकलन,संवर्धन,वाढणाऱ्या वयातला विकास घडताना एक समाजमन तयार होत असते.आपल्या ज्ञानेंद्रियाच्या संवेदनेत, पाहणे,ऐकणे, स्वाद,गंध ,स्पर्श या अवस्थेतून एक दृष्य संकल्पनेत माणूस नावाचा प्राणी वावरतोय!

आपल्या निसर्गात,पंचतत्वात सामील होताना या जीवनचक्रात एक आपली 'कडी' अडकवून आपण एकमेकात नांदत असतो.
या जीवनगतील सहकार्य,असहकार्य,विरोध,अवरोध करताना संप,मागण्या,बंध, पुकारत व्यवस्थेतून लक्ष वेधताना, आत्महत्या, बळजबरी,झुंड, नासाडी,मोडतोड,जाळपोळ या सर्व कठीण परिस्थितीत समाज जाताना,मन तयार करणे,मत तयार करणे,बाजू मांडताना प्रसिद्धी माध्यमांचा अवलंब करणे यातून समाज मनःस्थिती बनवून प्रचार,प्रसार करणे या नैतिक अवडंबरातून आपण सर्व भांबावलेले आहोत.

सत्तेची बीजगणिते, कायद्याची कलमे,विसंवादाची बीजे भुसभुशीत मनात नकळत पेरताना नक्की आपली प्रगती कशात आहे!हे कसं समजायचं..?

आजचे शिक्षण,स्वायत्तता, अभ्यासाचे मानेवर बसलेले भूत,स्पर्धा परीक्षा ची चढाओढ यातुन अव्वल स्थानात समाजकार्याचे निकष असताना,आर्थिक आकर्षण या माध्यबिंदूवर तरुण वर्गात तयार होणारी मानसिकता पाहता.. आज समाजाचा मुख्य टप्पा अंतर्गत स्पर्धेच्या वाळवीने पोखरून तरुण दिशाहीन होणे.. भविष्यात धोक्याचे आहे !

शहर,गाव,खेडी ,पाडे, वस्तीत,विखुरलेले समाजमन नेमकी कुठली दिशा,दिशाभूल या संभ्रमात आपण सर्व वावरतो आहोत?

.विभाग,प्रभाग,झेंडे,मोठ्ठाले फलक,चित्रे,व्यक्तिचित्रे यातून भविष्यात संघटित होताना आपापल्या समूहातून विकासाच्या नावे, स्पर्धा,कलाप्रदर्शन,कार्यक्रम,जलसा, भरवून आपण समाज कार्य करतोय!हा सामाजिक भ्रम आहे हे आपण सर्वांनी जाणून घेऊया!

उद्योग, व्यवसाय, कारखानदारी,यातून तरुण वर्ग,ध्येयवादी विचारात आपला परिसर,समाज,सहकार्यातून घडवू शकतो! ?,प्रदूषण मुक्त व्यवस्थेत निर्माण होणारा कचरा,दुषित पाण्याचे प्रवाह,नियोजनात ही येणाऱ्या काळाची गरज ओळखून आपला परिसर स्वच्छ ,मानसिक संतुलन,समाजभान बाळगून माणसाची मने एकत्र यायला हवीत!

समाज,कुटुंब,कलह,अद्दल,मनाचे खच्चीकरण, असुरी आनंदाची सरक चित्रे,संवाद, ही सर्व दृष्य, नाद लावणारी चढाओढ पाहता रोज एक गुंगीची मात्रा प्राशन करून  जगताना नेमके समजणे त्यातून काय समजायचे,समजून घ्यायचे?कठीण झाले आहे!

आजच्या प्रगतीच्या विकासाच्या काळात एक जिवंत स्वयंप्रकाशित तबकडी प्रत्येकाच्या हातात,खिशात,आहे.आपले नेहमीचे हार्ड कॉपी असलेले मित्र आज कमी आहेत.पण सॉफ्ट कॉपी मित्र खूप झालेत....आपल्या तबकडीत प्रत्येक जण काहीतरी दाखवतोय!प्रत्येक क्लिक वर दृष्य भार सोसत,कान स्वयंकेंद्रित झाले आहेत..हात, पाय,दिशा,मन,शरीर सर्वसर्व त्या तबकडी च्या आधीन करून, रोजचे जगणे शोधताना ..आपसात जिवंत राहण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे.

ससा,कासव,आपण सर्व या शर्यतीत धावतोय!आज प्रत्येकजण.. मी जिंकणार !असा भ्रम बाळगून आहे!

जन्मलेले प्लॅनिंग बाबा/ बेबी किंचाळत आहेत,जागोजागी शाळा  स्पर्धेचे धडे देत आहे.नोकरी,व्यवसायात भ्रष्ट बीज रुजलेले आहेत.वेडिंग,प्रिवेडिंग ,हळदी पार्टी रात्रीचे रान उठवते आहे.घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे,वृद्धाश्रम व्हिडिओ पाहताना आपण निबर पणे पाहतोय!मरणाच्या यात्रेत चार खांदे आत्ता एम्ब्युलन्स वर सोपवून तिलांजली देत, नंतर शोकसभेत मृत्यूसभेत आपले अस्तित्व शोधणे सुरू ठेवून.

जगण्याचे,मृत्यूचे,लग्नाचे, बारश्याचे, वाढदिवसाचे इव्हेंट साजरे करत आपण सर्व या शर्यतीत आहोत!

ही आपल्या समाजाची खरी शोकांतिका आहे..!.फक्त पळत राहा..!


राज वसंत शिंगे
१३/०१/२०२४

Comments

Popular posts from this blog

ईर्षा

जी... व...आणि न

कलेची कलाकारी...आणि कलविकास