कलेची कलाकारी...आणि कलविकास

 कलेची कलाकारी...आणि कला विकास .. 


चित्र,चित्राची दृष्य-भाषा अवगत करून कलावंत,कलाकार घोषित करून वावरणारे असंख्य आहेत.मुळात चित्र,शिल्प का करायचं?कशासाठी आकारायच ? हा एक प्रश्न मनात असतोच. 


बालचित्रकला याची सुरुवात मनस्मृतीतून अवगत होत असते.बालमनाच्या अंतर्गत दृष्य लहरींचे पृष्ठभागावर सादरीकरण असते. मनातील आंतरपटलावर  उमटणाऱ्या असंख्य रेघोट्यांतून त्याचे आकाराणे असते.रोज पाहिलेले रंग तो त्या आकारात शोधत रंगव्याप्ती घडवत असतो.हे घराच्या भिंतीवर बालपणी  चितारायच कोण शिकवतय ? कोणीही नाही ! 


ते त्या बालमनाचे स्पंदन असते.असंख्य आकाराच्या नियोजनात त्याचे मनन चिंतन असते. 


शालेय जीवनात काळ/वेळ/विषय/तासिका/शिस्तबद्ध /वर्ग/गट यांच्या सर्व आखणीत अभ्यास,पठण,अनुकरण करत आपल्या अंतर्गत कलागुणांचा विशिष्ट तासिकेत विकास असतो.अभ्यासाबरोबर चिंतन मनन करताना कला आणि कौशल्य या परिभाषेत आत्मसमान ,विकास,मानसिक सौंदर्यातून उदात्त भावनेचा विकास साधला जातो. 


कला महाविद्यालय या सर्जन वाटचालीत आपल्या रुचित आपण आपला विकास आणि कला ध्यास साधत अर्थार्जन/महत्वाकांक्षा/मानसिक विकास/समाजभान/कलेतून सहकार्यातून आपण स्वतःला कलाकार संबोधत आपल्या समाजात वावरत असतो. 


कलेचे शिक्षण,सराव, शोधक वृत्ती,स्वतःचे समाजातील स्थान,वेगळेपण शोधताना कलेतील संस्कारांची आपण पुनरावृत्ती करीत राहतो.आपण कला निपुण होतो ,पण आपला सृजनशील शोध संपुष्टात येत आपण आपल्याला सरावात जे अवगत झाले असते ..ते ते पुन्हा कलेतून आळवणे सुरू राहणे धोक्याचे होऊ शकते. 


आजच्या कला कार्यशाळा,कलामेळे,कला उत्सवात कलेच्या मांदियाळीत कलाकार आपली कला साजर करताना, आपल्या सरावाचे कलागणित मांडून जे कलाकार आपली कलेची शोभायात्रा साकारतात, ते समकालीन कलेच्या प्रवाहात कले पेक्षा स्वतःची कलाकारी दिखाऊ,बाजारी, व्यवहार चातुर्य ,शोभिवंत कला- किर्द दाखवत कलाक्षेत्रात वावरणे धोक्याचे वाटते. 


समकलातील कलेची जाण, कलशिक्षण,कलाकार या प्रवाहात मूर्त/अमूर्त वादात आज कलाकार विभागलेला आहे.समकालात कलाशिक्षणाची सकस दिशा,कला चिंतन,मनन,अवलोकन,चर्चा,सुसंवाद, कला प्रसार,कलेचे विचार मंथन,कलेचा विचारविनिमय यांची कलादिशा अस्पष्ट असताना,या समकालीन कला उरूस,कलाप्रदर्शनातुन ,कला मेळे कार्यशाळेतून सामूहिक कलेचा हौदोसातून आपण नेमके काय साधतोय? याचा विचार समकलात असायला हवा. 


काही बुजुर्ग कलाकार हे केवळ उत्सवमूर्ती होत नेमके समकलात कलाकारांना काय मार्गदर्शन, दिशा देतात हा चिंतनाचा विषय आहे. 


कलादालने,कला संग्राहक आणि स्वतःला प्रतिथयश म्हणवणारे कलाकार आणि  स्वतःला सिध्द करण्यासाठी ची कलाक्षेत्रातली स्वतःला प्रदर्शित करण्याच्या चढाओढित आजचे कला विश्व वावरते आहे. 


भारतीय कला शास्त्र, भारतीय कला ,समकालीन लोककलेचा विकास,कलेतील मानसिक विकास,परंपरा, सांस्कृतिक जडणघडण होत आपला समकलातील कला शिक्षण आधारलेले असायला हवे ते बाजूला सारून,पाश्चिमात्य प्रवाहात आपले कला शिक्षण वाहत जात, आपण नेमके कुठल्या धक्क्याला लागलोय ?हे शोधण्याची गरज आहे. 


कलाकार अनुकरण करतोय! कलावंत निव्वळ अर्थाजनात जगतोय?समाजात व्यक्तिचित्रे, व्यक्तिशिल्पे, पुतळे हे परिसर सुशोभीकरण करताना चौकात, इमारतीत येणारी कलाकृती चे निकष तपासायची गरज आहे. 


शहर सुशोभीकरण, सौंदर्य,इमारतीचे समकालीन महत्व,परिसर,कलाकृतीचे अधिष्ठान या सर्व विचारात दिशा हवी. यातही आपले कलेचे टेंडर पास करून चित्र/शिल्प/पुतळ्यांच्या घोळ सुरू आहे. 


भारतीय कलेच्या समकलात भव्य मांडणी शिल्पे जगभरात साकारली आहेत... पण भारतात,शहर ,जिल्ह्यात, मुख्य सरकारी इमारतीत, सार्वजनिक जागेत आणि भर चौकात आजचे दृष्य चित्र.भेसूर.भयानक साकारत.. आज जो  कलाविकासाचा समाज व्यापार सुरू आहे ! हे भविष्यात, कला प्रांतात कलेला, कलाकारांना घातक ठरू शकते!



राज वसंत शिंगे

१९/०१/२०२४






Comments

Popular posts from this blog

ईर्षा

जी... व...आणि न